दापोली अर्बन बँक कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) गौरवशाली प्रवासावर आधारित विशेष माहितीपटाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. भौतिकशास्त्र विभागातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी इस्रोच्या ऐतिहासिक कार्याचा सखोल अभ्यास करून या माहितीपटाची निर्मिती केली.
भारताच्या अंतराळ संशोधनातील प्रगती, भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान आणि विविध ऐतिहासिक अंतराळ मोहिमांची माहिती या माहितीपटातून दृकश्राव्य माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आली. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट, इनसॅट मालिका, चांद्रयान-१, चांद्रयान-२, चांद्रयान-३, मंगळयान तसेच सूर्याच्या अभ्यासासाठीची आदित्य-एल१ या महत्त्वपूर्ण मोहिमांचा माहितीपटात सविस्तर आढावा घेण्यात आला.
इस्रोच्या स्थापनेपासून चंद्र आणि सूर्याच्या अभ्यासापर्यंत भारताने गाठलेल्या अंतराळ संशोधनाच्या प्रगतीचा प्रवास विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या आधारे मांडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती मिळण्यासोबतच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्ती विकसित होण्यास मदत झाली.
या माहितीपटाच्या निर्मितीसाठी भौतिकशास्त्र विभागप्रमुख डी. डी. कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक व्ही. आर. जोशी आणि ए. एस. महाजन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संशोधन, पटकथा लेखन, दृश्यसाहित्य संकलन तसेच अंतिम सादरीकरणाच्या विविध टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी अधिक जिज्ञासा निर्माण व्हावी, या उद्देशाने हा माहितीपट इतर महाविद्यालयांमध्येही प्रदर्शित करण्याचा भौतिकशास्त्र विभागाचा मानस आहे. यासाठी इच्छुक महाविद्यालयांनी भौतिकशास्त्र विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य जी. बी. साठे, संस्थेचे संचालक रविंद्र कालेकर तसेच सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













