रत्नागिरी : ट्रेडिंगच्या आमिषाने 11.37 लाखांची सायबर फसवणूक, महिला व तिच्या पतीची आर्थिक फसवणूक

banner 468x60

कमी वेळेत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून रत्नागिरीतील एका महिला व तिच्या पतीची तब्बल ११ लाख ३७ हजार १४.५८ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जून २०२६ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत कुवारबाव, रत्नागिरी येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.३९ वाजता रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, महिलेच्या पतीची सोनल जगन्नाथ नाईक नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सअॅपवरून ओळख झाली. या व्यक्तीने तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘Julius Baer Mobile’ नावाचे ट्रेडिंग अॅप्लिकेशन त्यांच्या मोबाईलमध्ये लॉगिन करण्यास सांगण्यात आले.

या अॅपच्या माध्यमातून IPO आणि OTC ट्रेडिंगमध्ये कमी कालावधीत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर सोनल नाईक हिने विविध व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून संपर्क साधत तक्रारदार व त्यांच्या पतीची कथितरित्या दिशाभूल केली आणि वेगवेगळ्या कारणांखाली पैसे गुंतविण्यास भाग पाडले.

दरम्यान, कुणाल सुमया नावाच्या व्यक्तीने स्वतःला ‘Julius Baer Mobile’ कंपनीचा प्रमुख असल्याचे भासवून कंपनीच्या नियमांनुसार संपूर्ण रक्कम भरावी लागेल, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारे आरोपींनी तक्रारदार महिलेच्या संयुक्त ICICI बँक खात्यातून ११ लाख १७ हजार १४.५८ रुपये, तर त्यांच्या पती महेंद्र यांच्या ICICI NRI बँक खात्यातून २० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.

अशाप्रकारे एकूण ११ लाख ३७ हजार १४.५८ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०५/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(C) आणि ६६(D) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी सोनल जगन्नाथ नाईक आणि कुणाल सुमया यांच्याविरुद्ध पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ऑनलाइन ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीतून कमी वेळेत मोठा नफा मिळण्याचे आमिष दाखवून पैसे मागितले जात असल्यास नागरिकांनी सावध राहावे, तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून ट्रेडिंग अॅप डाउनलोड करून आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *