वणौशी तर्फ पंचनदी (प्रतिनिधी : सागर गोवळे) ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना आधुनिक, शास्त्रीय व शाश्वत शेतीची माहिती मिळावी, या उद्देशाने ‘कृषिस्नेही’ गटातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुरववाडी येथे ‘कृषी माहिती केंद्रा’चे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन वणौशीचे उपसरपंच प्रकाश तेरेकर यांच्या हस्ते झाले.

प्रदर्शनात माहितीपत्रके, प्रत्यक्ष नमुने, कृषी निविष्ठा आणि आकर्षक मॉडेल्सच्या माध्यमातून विविध कृषीविषयक विषयांची माहिती देण्यात आली. बीजामृत, जीवामृत, गोकृपा अमृतम यांसारख्या जैविक खतांची निर्मिती, वापर आणि शाश्वत शेतीतील महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पावसाच्या पाण्याचे साठवण, वर्मीवॉश, गांडूळखत, लाखी बाग आणि मिनिएचर गार्डन यांची प्रतिकृती साकारून उपलब्ध साधनांचा कमी खर्चात प्रभावी वापर कसा करता येतो, हे प्रात्यक्षिकातून दाखवण्यात आले. तसेच विदेशी फळे, तृणधान्ये, कडधान्ये, हिरवळीची खते आणि मूल्यवर्धित उत्पादनांची माहिती देण्यात आली.

पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनासाठी हानिकारक कीटकांचे नमुने, त्यांची लक्षणे, जैविक व्यवस्थापन पद्धती तसेच फवारणी करताना वापरावयाच्या संरक्षण किटची माहितीही देण्यात आली. बियाण्यांची उगवण चाचणी, विविध वाण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली सुधारित वाणे आणि आधुनिक कृषी अवजारांची ओळख विद्यार्थ्यांनी करून दिली.
प्रदर्शनाला अशोक जाधव, साक्षी गुरव, गोविंद सूर्यवंशी तसेच कृषी महाविद्यालय दापोली येथील डॉ. प्रवीण झगडे, डॉ. रणजीत महाडिक आणि डॉ. विजय देसाई यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी तयार केलेली मॉडेल्स, शिस्तबद्ध मांडणी आणि विषयाची प्रभावी मांडणी पाहून मान्यवर व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
हा उपक्रम कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोककुमार चव्हाण, रावे केंद्रप्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. रणजीत महाडिक तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समृद्धी जाधव, निलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, अंकिता मुंज, सलोनी सावंत, कोमल झिरवाळ, श्रावणी मोरे आणि आकांक्षा गाडगे या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. प्रशांत जालगावकर यांनीही मोलाचे सहकार्य केले. ग्रामीण भागात शाश्वत व तंत्रज्ञानाधारित शेतीबाबत जनजागृती करणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













