रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्ता खचल्याने बंद करण्यात आलेली एसटी वाहतूक अखेर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या अडचणींचा सामना करणाऱ्या प्रवासी, नोकरदार आणि वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
ओझरे खिंड परिसरात रस्त्याला भेगा पडून काही भाग खचल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव अवजड मालवाहतूक यापूर्वीच बंद करण्यात आली होती. त्यानंतर ९ ऑगस्टपासून आंबा घाटातील एसटी वाहतूकही बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.
या परिस्थितीची दखल घेत आमदार किरण उर्फ भैया सामंत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, संगमेश्वरच्या तहसीलदार अमृता साबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महसूल विभागाचे अधिकारी, बांधकाम सभापती विलास चाळके तसेच रत्नागिरी व कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंबा घाटातील खचलेल्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीनंतर आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी सावधगिरी बाळगत आणि वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवून वाहतूक सुरू करता येऊ शकते, असे सांगितले होते. त्यानुसार विभाग नियंत्रक जानराव यांच्या आदेशानंतर रत्नागिरी विभागाची एसटी वाहतूक आजपासून आंबा घाट मार्गे सुरू करण्यात आली.
वाहतूक सुरू करताना सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. खचलेल्या ओझरे खिंड परिसरात एसटी चालक व वाहकांना अत्यंत सावकाश वाहन चालविण्याच्या सूचना देण्यासाठी रत्नागिरी विभागाची मार्ग तपासणी टीम तैनात करण्यात आली आहे. सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश वायदंडे, टी.सी. सुनील माळी, चालक विश्वास कनवजे आणि यशवंत मयेकर हे या ठिकाणी उपस्थित राहून वाहतुकीवर लक्ष ठेवत आहेत. वाहतूक अधिकारी सचिन सुर्वे यांचेही यासाठी सहकार्य लाभले.
दरम्यान, आज सकाळी ७.१५ वाजता देवरुख बसस्थानकातून सुटलेली देवरुख-लातूर एसटी बस आंबा घाटातील ओझरे खिंड मार्गे सुखरूप आणि व्यवस्थित पुढे गेल्याची माहिती सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश वायदंडे यांनी दिली.
एसटी वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, यासाठी आमदार किरण उर्फ भैया सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, वाहतूक विभागातील अधिकारी तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रवाशांनी आभार मानले आहेत.
मात्र ओझरे खिंडीत रस्ता खचलेला असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूनच प्रवास करणे आवश्यक आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













