रत्नागिरी : गोळप नदीत बुडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, शाळेतून घरी आल्यानंतर पोहायला गेला अन् काळाने घात केला

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. आर्यन संतोष पालकर (१२, रा. गोळप पंचशील, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे गोळप परिसरावर शोककळा पसरली असून, पालकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

banner 728x90

आर्यन हा सहावी इयत्तेत शिक्षण घेत होता. गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आल्यानंतर सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास तो मित्र सार्थक पालकर याच्यासोबत घराजवळील नदीवर पोहण्यासाठी गेला होता.

दोघेही नदीत पोहत असताना आर्यनला अचानक पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. प्रसंगावधान राखत आर्यनने आरडाओरड करून मदतीसाठी हाक मारली. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने नदीच्या दिशेने धाव घेतली.

आर्यन पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी जीवाची पर्वा न करता नदीत उड्या घेत त्याचा शोध सुरू केला. नागरिकांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी सुमारे ६.३० वाजता आर्यनला नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

आर्यनला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची प्रकृती गंभीर होती. रात्री सुमारे ९.२० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून आर्यनला मृत घोषित केले.

अवघ्या १२ वर्षांच्या आर्यनचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने पालकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहान वयातच आर्यनचा मृत्यू झाल्याने नातेवाईक, मित्रपरिवार आणि गोळप परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिसांनी घटनाक्रमाची नोंद केली असून, पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नदी, तलाव किंवा अन्य जलस्रोतांमध्ये पोहण्यासाठी जाताना लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी तसेच पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *