दापोली : शाळकरी मुलीचा विनयभंग, फरार संशयित आरोपीला दापोली पोलिसांकडून अटक

banner 468x60

दापोली तालुक्यात शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या ३२ वर्षीय संशयित आरोपीला दापोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शिताफीने अटक केली. दिपेश दिलीप तांबे (रा. भाटघर, ता. दापोली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

banner 728x90

प्राप्त माहितीनुसार, ३१ जुलै रोजी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ तसेच पोक्सो अधिनियमाच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शाळकरी मुली बसमधून प्रवास करत असताना संशयित आरोपी दिपेश तांबे याने त्यांचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा आरोप आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होता. गुन्ह्याची गांभीर्यता लक्षात घेऊन दापोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान संशयित आरोपी मजुरीच्या निमित्ताने खेड व चिपळूण परिसरात फिरत असून तेथे अल्पकाळ वास्तव्य करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी खेड-चिपळूण परिसरात शोधमोहीम राबवली. स्थानिक माहिती आणि गोपनीय पथकाच्या अचूक मदतीने ११ ऑगस्ट रोजी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत API हिरेमठ, PSI यादव, महिला पोलीस कॉन्स्टेबल पाटेकर, पोलीस कॉन्स्टेबल क्रमांक ४७५ आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *