रत्नागिरी शहर आणि परिसरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच रत्नागिरीतील बँक ऑफ इंडियाच्या मारुती मंदिर शाखेतील एका खातेदाराच्या खात्यातून अवघ्या एका तासात ५ लाख ८६ हजार ९ रुपये परस्पर वळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतिनगर येथील रहिवासी धीरज अर्जुन भानुशाली यांचे बँक ऑफ इंडियाच्या मारुती मंदिर परिसरातील शाखेत बचत खाते आहे. २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३६ ते ७.३७ या अवघ्या एका तासाच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने सायबर पद्धतीने त्यांच्या खात्यात सेंध मारत ५,८६,००९ रुपये परस्पर हस्तांतरित केले.
ही बाब लक्षात आल्यानंतर धीरज भानुशाली यांचे मित्र व कर सल्लागार राजेश रमेश सोहनी यांनी ३१ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम २००० चे कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेचा पुढील तपास सायबर पोलीस करीत असून, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक तपशील कोणाशीही शेअर करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













