पनवेलजवळील खारपाडा टोलनाक्यावर मुंबई-गोवा कोकण महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच टोलवसुली सुरू करण्यात आल्याच्या निषेधार्थ जनआक्रोश समितीने आंदोलन तीव्र केले आहे. महामार्गावरील अपूर्ण कामे, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न प्रलंबित असतानाच टोल आकारणी सुरू केल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जनआक्रोश समितीचे पदाधिकारी अनिष निंबकर, रुपेश दर्गे, संजय जंगम, सुरेंद्र पवार, अनिकेत मेस्त्री आणि अरविंद तांबे यांच्या नेतृत्वाखाली खारपाडा येथे गेल्या चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना वाहनचालकांकडून सक्तीने टोल वसूल केला जात आहे. सध्या पहिल्या टप्प्यात ९५ रुपयांचा टोल आकारला जात असून याविरोधात नागरिकांनी एकजूट दाखवण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

जनआक्रोश समिती गेल्या चार वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. यासाठी विविध शासकीय विभागांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून मागील वर्षी माणगाव येथे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणही केले होते. त्यावेळी शासनाकडून काही आश्वासने देण्यात आली होती, मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नसल्याचा आरोप समितीने केला आहे.
दरम्यान, आंदोलनाला विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळत आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष कवी व लेखक बाळ कांदळकर, पारसिक बँकेचे निवृत्त प्रबंधक राजन पवार, वाल्मिकी सैंदाणे आणि शशिकांत घरत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना समर्थन दिले. समितीचे खजिनदार संजय जंगम आणि कार्याध्यक्ष सुरेंद्र पवार यांची भेट घेऊन त्यांनी आंदोलनाला नैतिक पाठिंबा जाहीर केला.

यावेळी बोलताना बाळ कांदळकर यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचा मुद्दा उपस्थित केला. या महामार्गावर आतापर्यंत हजारो नागरिक जखमी झाले असून शेकडो जणांना जीव गमवावा लागला आहे. तरीही सरकारकडून ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महामार्ग पूर्णत्वास नेणे, सुरक्षितता वाढवणे आणि नागरिकांवरील अन्यायकारक टोलवसुली थांबवणे यासाठी प्रत्येक कोकणवासीयाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
खारपाडा टोलनाक्यावर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून शासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













