दापोली : टेटवलीत 1200 फळझाडांच्या कलमांचे आणि हळद बियाणांचे मोफत वाटपदुर्गामाता सेवा प्रतिष्ठान व अक्षय प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम, 31 मे रोजी गावदेवी मंदिरात भव्य कार्यक्रम

banner 468x60

पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने दुर्गामाता सेवा प्रतिष्ठान, टेटवली आणि अक्षय प्रतिष्ठान, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थांसाठी मोफत फळझाडे कलम व हळद बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता गावदेवी मंदिर, टेटवली (ता. दापोली) येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे.

banner 728x90

ग्रामीण भागात फळबाग लागवडीला प्रोत्साहन मिळावे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून दुर्गामाता सेवा प्रतिष्ठान विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असून या उपक्रमालाही स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या कार्यक्रमात आंबा, काजू, फणस, नारळ, सुपारी, चिकू आणि पेरू यांसारख्या विविध प्रकारच्या सुमारे १२०० फळझाडांच्या कलमांचे तसेच हळद बियाणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणार असून भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीही मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरोदे समाज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., टेटवलीचे अध्यक्ष सुभाष क्षिरसागर हे असणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जालगावचे सरपंच अक्षय फाटक, प्रसिद्ध उद्योजक विश्वासराव जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसमिती महाराष्ट्र प्रांताचे माजी उपाध्यक्ष गंगाराम इदाते, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवलीचे संचालक. डॉ. अरुण माने, उमेद दापोलीचे तालुका व्यवस्थापक अभिजित भंडारी, तालुका अभियान व्यवस्थापक विशाल लांजेकर, ग्रामपंचायत टेटवलीचे प्रशासक मोबीन टेटवलकर तसेच महामाई काळकाई ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष मंगेश रेमजे उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी शेती, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासासंदर्भात मार्गदर्शनपर मनोगतेही होणार असून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच फळबाग लागवड, झाडांची निगा आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

पंचक्रोशीतील जास्तीत जास्त शेतकरी, महिला बचत गट, युवक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दुर्गामाता सेवा प्रतिष्ठान, टेटवलीचे अध्यक्ष. रमेश गोविंद भागवत यांनी केले आहे. पर्यावरण संवर्धन आणि शेती विकासासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *