राजापूर : मांडरुळ गणेशवाडीत लाकडी बांबू आणि पाईपने हल्ला, महिलांसह चौघे गंभीर जखमी

banner 468x60

राजापूर तालुक्यातील मांडरुळ गणेशवाडी येथे आईच्या मालकीच्या जागेच्या वारस हक्काच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात तिघा नातेवाईकांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पम्मी फलचंद जयस्वार (वय ४३, रा. नालासोपारा पूर्व) यांच्या आई पार्वती मासये यांच्या मालकीच्या जागेच्या वारस तपासावरून कुटुंबातील नातेवाईकांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. या पार्श्वभूमीवर पम्मी जयस्वार या त्यांच्या आई पार्वती मासये, मुलगा मेघराज आणि बहीण पुष्पा गणेश पुजारी यांच्यासह राजापूर येथे आल्या होत्या.


२५ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिवंडमाळ परिसरात आरोपी वैभव मासये याने फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अडवून अश्लील शिवीगाळ केली. तसेच “तुम्ही परत मुंबईला जिवंत जाणार नाही” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २६ मे रोजी सकाळी सुमारे ७:२० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पम्मी जयस्वार या आपल्या आई, मुलगा आणि बहिणीसह आरोपी मंगल बाबुलाल हडाळे यांच्या घरी आधारकार्ड आणण्यासाठी Mandarule Ganeshwadi येथे गेल्या होत्या. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या आरोपी मानसी वैभव मासये हिने संतापाच्या भरात फिर्यादी पम्मी जयस्वार, त्यांचा मुलगा मेघराज जयस्वार, बहीण पुष्पा पुजारी आणि आई पार्वती सीताराम मासये यांच्यावर लाकडी बांबू आणि लोखंडी पाईपने हल्ला केल्याचा आरोप आहे.


या मारहाणीत चौघांनाही गंभीर दुखापती झाल्या असून परिसरात मोठी खळबळ उडाली. हल्ल्यानंतर आरोपींनी पुन्हा शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी २७ मे रोजी सकाळी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मंगल बाबुलाल हडाळे (वय ५०), मानसी वैभव मासये (वय २३) आणि वैभव मासये (सर्व रा. मांडरुळ गणेशवाडी, ता. राजापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ७९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(१) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *