खेड तालुक्यातील केळणे येथील बौद्धवाडी परिसरात गुरांनी पेंड खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेला किरकोळ वाद चांगलाच चिघळून हाणामारीपर्यंत पोहोचला. या घटनेत दोन्ही बाजूंचे काहीजण जखमी झाले असून, खेड पोलिस ठाणे येथे परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी एका तक्रारीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळच्या सुमारास केळणे बौद्धवाडी परिसरात गुरांनी पेंड्याच्या उडवीतील पेंढे खाल्ल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. मात्र, काही वेळातच या वादाचे रूपांतर जोरदार बाचाबाची, शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी विठ्ठल धोंडू खरात (वय ४५, रा. केळणे – धनगरवाडी) यांनी खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, विकास सखाराम कदम आणि वर्षा विकास कदम यांनी गुरांनी पेंड खाल्ल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर विकास कदम यांनी हातातील काठीने विठ्ठल खरात यांच्या डोक्यात मारहाण करून दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे, विकास सखाराम कदम (वय ५५, रा. केळणे – बौद्धवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीत संदीप खरात, विठ्ठल खरात, सचिन वरक आणि निलेश वरक यांनी घरासमोरील पेंड्याची उडवी गुरांनी ओढल्याच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ, धक्काबुक्की आणि काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत विकास कदम यांच्यासह त्यांची मुलगी वैष्णवी कदम हिलाही दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, विकास कदम यांनी आपण अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे नमूद करत जातिवाचक अपमान केल्याची तसेच मारहाण झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. त्यानुसार खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३५२, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ३(१)(आर) आणि ३(२)(व्हीए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर केळणे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलिस ठाणे करत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













