रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावत अनेक तालुक्यांना झोडपून काढले. चिपळूण आणि खेड येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर मंडणगड येथे गारांचा वर्षाव झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. लांजा, संगमेश्वर, गुहागर आणि दापोली या तालुक्यांमध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.

या बेमोसमी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा बागायतदारांना बसला असून हाती आलेल्या पिकाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आधीच हवामानातील अनिश्चिततेमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


गुरुवारी दुपारी अचानक आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. तळसर बौद्धवाडी येथे संदीप मोहिते यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले.

मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. वाहनधारकांना दिवसा देखील हेडलाईट लावून प्रवास करावा लागला. विशेषतः मंडणगड तालुक्यात पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. येथे गारांसह पाऊस पडल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली.
सायंकाळनंतर अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला होता, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














