दापोली : करंजाणीतील वृद्धेचा मृत्यू नैसर्गिक, पण बोरमाळ हरवल्याने संशय कायम

banner 468x60

दापोली तालुक्यातील करंजाणी (दर्भाची वाडी) येथे घडलेल्या ८१ वर्षीय सुलोचना साळवी यांच्या मृत्यूच्या घटनेने काही दिवसांपूर्वी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा गावात आणि आसपासच्या भागात जोरात रंगली होती. मात्र आता प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

तरीदेखील त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ गायब असल्यामुळे या प्रकरणातील गूढ अद्याप कायम आहे. करंजाणी येथील दर्भाची वाडीमध्ये सुलोचना साळवी या आपल्या राहत्या घरी एकट्याच राहत होत्या. दररोजप्रमाणे त्या सकाळी लवकर उठत असत, मात्र घटनेच्या दिवशी त्या उशिरापर्यंत बाहेर न आल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता साळवी या आपल्या बेडरूममध्ये बेडवर उताण्या अवस्थेत, अंगावर ब्लॅंकेट घेऊन निश्चल पडलेल्या आढळून आल्या. त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल नसल्याचे दिसून आल्यानंतर शेजाऱ्यांनी तत्काळ दापोली पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश तोरसकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत प्राथमिक तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे घातपाताच्या दृष्टीने पाहिले. कारण साळवी यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ गायब असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने घातपात झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात होती.

तथापि, घरातील इतर मौल्यवान वस्तूंना कोणतीही हानी पोहोचलेली नव्हती. विशेष म्हणजे देवासाठी ठेवलेले सुमारे १३ तोळ्यांचे सोन्याचे दागिनेही सुरक्षित अवस्थेत आढळून आले. त्यामुळे या घटनेतील संशय अधिक गडद झाला. साळवी यांच्या गळ्यात मृत्यूच्या वेळी बोरमाळ होती की नाही, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी तपासासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या.

त्यानुसार पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू ठेवला आहे. घटनेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शवविच्छेदन अहवाल. या अहवालानुसार सुलोचना साळवी यांचा मृत्यू पूर्णपणे नैसर्गिक कारणामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घातपाताचा संशय आता कमी झाला असून पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. मात्र, गळ्यातील सोन्याची बोरमाळ अद्याप सापडलेली नसल्यामुळे चोरीचा मुद्दा कायम आहे.सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. बोरमाळ नेमकी कधी आणि कशी गायब झाली, याचा शोध घेण्यासाठी पोलिस विविध शक्यता तपासत आहेत. परिसरातील लोकांकडूनही माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

या संपूर्ण घटनेमुळे करंजाणी परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नैसर्गिक मृत्यू असल्याचे स्पष्ट झाले असले तरी गळ्यातील बोरमाळेचे गूढ अद्याप उकललेले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर हे प्रकरण सोडवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तथापि, दापोली पोलिसांच्या आतापर्यंतच्या यशस्वी तपास पद्धतीवर विश्वास व्यक्त करत, या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *