चिपळूण तालुक्यातील रामपूर-देवखेरकी परिसरातून एक अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. येथील एका हापूस आंब्याच्या बागेत जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आल्याने संपूर्ण कोकणात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांसमोर गुन्ह्याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बागेत काम करणाऱ्या एका मजुराला सुमारे दीड महिन्यापूर्वी संशयास्पद अवस्थेत जळालेला सांगाडा दिसून आला होता. मात्र, भीतीपोटी त्याने ही बाब कोणालाही सांगितली नव्हती. अखेर मनातील भीती बाजूला ठेवत त्याने बागेच्या मालकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले आणि या थरकाप उडवणाऱ्या प्रकरणाचा उलगडा झाला.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. दीड महिना उलटल्याने मृतदेह पूर्णपणे जळून केवळ सांगाडा उरलेला आहे. घटनास्थळी जळालेल्या निळ्या रंगाच्या बॅगेचे अवशेष आढळले असून, मृतदेह त्या बॅगेत भरून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याशिवाय दोन लोखंडी रॉडही घटनास्थळी सापडले असून, या कृत्यात त्यांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, हा सांगाडा १२ ते १३ वर्षे वयोगटातील मुलगा किंवा मुलगी यांचा असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. इतक्या लहान वयाच्या बालकाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, रत्नागिरी येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळाची सखोल पाहणी करण्यात आली आहे. सांगाड्यातील हाडांचे नमुने डीएनए तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवण्यास मदत होणार आहे.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला असून, परिसरातील हरवलेल्या मुलांची नोंद, मागील काही महिन्यांतील बेपत्ता तक्रारी, तसेच संशयित हालचालींची माहिती गोळा करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांचीही चौकशी सुरू असून, गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी विविध तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे देवखेरकी आणि आसपासच्या परिसरात प्रचंड भीतीचे सावट पसरले आहे. नागरिकांनी पोलिसांकडे त्वरीत तपास पूर्ण करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. या भीषण घटनेमागील सत्य काय आहे, आणि निष्पाप बालकाचा जीव घेणारा आरोपी कोण, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













