मंडणगड–आंबडवे–लोणंद राष्ट्रीय महामार्गावर मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ बौद्धवाडी परिसरात रविवारी (दि. १ मार्च २०२६) सकाळी झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅव्हलर बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत युवकाचे नाव साहिल विजय बेंद्रे (वय २३) असे असून तो मूळचा लांजा तालुक्यातील खोचरे गावचा रहिवासी होता. सध्या तो घाटकोपर येथे वास्तव्यास होता. शिमगोत्सव साजरा करण्यासाठी साहिल आपल्या आठ मित्रांसह दुचाकीवरून दापोली तालुक्यातील पांगारी गावाकडे निघाला होता. मात्र प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यातच त्याच्यावर काळाने झडप घातली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, म्हाप्रळ बौद्धवाडी येथे महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर डायव्हर्शन देत एकेरी वाहतूक सुरू होती. सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास साहिल दुचाकीने पुढे जात असताना समोरून मुंबईच्या दिशेने जाणारी प्रवासी ट्रॅव्हलर बस अतिवेगाने व बेदरकारपणे येत दुचाकीला समोरून धडकली. या धडकेत साहिल बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला सहप्रवासी दूर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला.
जखमी सहप्रवाशाला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भिंगळोली येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली असून अपघातास कारणीभूत ट्रॅव्हलर बस व चालक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. संबंधित चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















