लांजा शहरातील वैभव वसाहत येथून ४५ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना रविवार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिचा मुलगा गुफरान अशरफ पाटणकर (२२, रा. वैभव वसाहत, लांजा) यांनी लांजा पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या हवाबी अशरफ पाटणकर (४५, रा. वैभव वसाहत, लांजा, ता. लांजा, जि. रत्नागिरी) या गेल्या दीड महिन्यांपासून पित्ताच्या पिशवीच्या आजाराने त्रस्त असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथील अस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेच्या दिवशी पती अशरफ मुसा पाटणकर (५०) नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरी परतल्यावर घराच्या बाहेरील दरवाजाची कडी लावलेली दिसली. कडी काढून आत प्रवेश केल्यावर घरात कोणीही नसल्याचे तसेच पत्नीचा मोबाईल घरातच आढळून आल्याचे त्यांनी पाहिले.
यानंतर आजूबाजूच्या परिसरात व नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली; मात्र हवाबी पाटणकर यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे मुलगा गुफरान पाटणकर यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
हवाबी पाटणकर यांचे वर्णन :
रंग निमगोरा, अंगाने मध्यम, उंची सुमारे ४ फूट ३ इंच, केस काळे व लांब, चेहरा गोल. कानात सोन्याचे गोल रिंग, गळ्यात एक मन्याचे मंगळसूत्र, डाव्या हातात गोल्डन रंगाचे घड्याळ, उजव्या हातात हिरव्या बांगड्या, उजव्या पायात काळा दोरा, डाव्या डोळ्याच्या भुवईवर जुन्या जखमेचा व्रण. अंगात मेहंदी रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात काळ्या रंगाची सँडल.
या वर्णनाची व्यक्ती कोठे आढळून आल्यास त्वरित लांजा पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विकास पवार करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















