चिपळूण तालुक्यातील कापसाळ–फणसवाडी परिसरात शनिवारी मध्यरात्री लोकवस्तीत एक महाकाय मगर शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अचानक लोकवस्तीत मगर दिसताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ही बाब लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ नागेश कांबळी यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
वनपाल एस. एस. सावंत, रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे, वाहनचालक नंदकुमार कदम तसेच प्रणित कलकुटकी आणि अजय बडदे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने अत्यंत शिताफीने या मगरीला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले.
पकडण्यात आलेली मगर सुमारे ८ ते ८.५ फूट लांबीची असून ती पूर्ण वाढ झालेली असल्याचे आढळून आले. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कोणतीही जीवितहानी होऊ न देता ही संपूर्ण कारवाई पार पाडण्यात आली. त्यानंतर मगरीची वैद्यकीय तपासणी करून ती पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. हे संपूर्ण बचावकार्य विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई-पाटील, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.
वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला असून कापसाळ व फणसवाडी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. वनविभागाच्या तत्परतेचे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















