चिपळूण : अवघ्या 27 वर्षीय विवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या, पती विजय मोहिते सह 5 जणांवर गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील आकले तळवडेवाडी येथील जयश्री विजय मोहिते (वय २७) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. अपत्य होत नसल्याच्या कारणावरून तिचा छळ केला जात असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90 banner 728x90


पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पेरणे येथील नामदेव लक्ष्मण मोहिते यांची कन्या जयश्री हिचा विवाह ३ जुलै २०१७ रोजी आकले तळवडेवाडी येथील विजय भगवान मोहिते याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीची चार वर्षे संसार सुरळीत चालला. मात्र, लग्नाला बराच काळ होऊनही अपत्य होत नसल्याने सन २०२२ पासून तिला सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली.


सासरच्या मंडळींकडून सतत होणाऱ्या या छळाला कंटाळून जयश्री हिने २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन केले. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र सखोल तपास आणि माहेरच्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मयत जयश्रीचे वडील नामदेव मोहिते (वय ७६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विजय भगवान मोहिते (पती), भगवान शिवा मोहिते (सासरे), कुसुम भगवान मोहिते (सासू), राजु भगवान मोहिते (दीर), नेताजी भगवान मोहिते (दीर) या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.


या पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ८५, १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने लग्नाच्या आठ वर्षांच्या आत आत्महत्या केल्याने आणि छळाचे आरोप असल्याने पोलीस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *