खेड : तालुक्यात गुटख्याचा सुळसुळाट; बंदी असूनही खुलेआम विक्री, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात राज्यभर बंदी असलेल्या गुटख्याची राजरोसपणे विक्री होत असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. शासनाने गुटखा विक्रीवर कठोर बंदी घातलेली असतानाही तालुक्यातील अनेक किराणा दुकाने, पानटपऱ्या तसेच छोट्या-मोठ्या स्टॉलवर उघडपणे गुटखा विकला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

banner 728x90 banner 728x90


खेड तालुक्याचा ग्रामीण भाग सध्या गुटखा विक्रीचे केंद्रस्थान बनत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. खोपी, लोटे, भरणे यांसारख्या परिसरांमध्ये गुटख्याचे मोठ्या प्रमाणावर साठे असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी तर दुकानांमध्ये गुटखा सहज उपलब्ध होत असून ग्राहकांकडून त्याची खुलेआम खरेदी-विक्री सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.


तालुक्यात विक्रीसाठी येणारा गुटखा शेजारील चिपळूण, सावर्डे आदी भागांतून खेडमध्ये आणला जात असल्याचीही चर्चा रंगली आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात गुटखा पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र या संदर्भात अधिकृत कारवाई किंवा जप्तीची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही.


विशेष म्हणजे खेड हा गृहराज्यमंत्र्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. अशा तालुक्यातच बंदी असलेला गुटखा खुलेआम विकला जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्यभर बंदी असलेला पदार्थ इतक्या सहजपणे उपलब्ध होत असताना पोलिस यंत्रणेला याची माहिती नाही का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


गुटखा विक्रीमुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढतो, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर विक्रीवर तात्काळ कारवाई करून दोषींवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *