गुहागर : तळवलीत वीज कोसळून ५ लाखांचे नुकसान, कारूळमधील ६३ कुटुंबांना स्थलांतराची नोटीस

banner 468x60

गुहागर तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्याची सरासरी १९०.४ मिलिमीटरवर पोहोचली आहे. यामध्ये गुहागर शहरात सर्वाधिक २७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तळवली आणि कारूळ गावांमध्ये मोठ्या नुकसानीची नोंद झाली आहे.

banner 728x90 banner 728x90

तळवलीत वीज कोसळून ५.१० लाखांचे नुकसान
गुरुवारी रात्री झालेल्या पावसात तळवली येथील अनंत भोळे आणि गणेश भोळे यांच्या घरातील मीटरवर वीज कोसळून घरातील सर्व इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये तब्बल ५ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

तलाठी हनुमंत भिसे यांनी घराच्या नुकसानीचा पंचनामा केला असून, अनंत भोळे यांचे ३ लाख ५ हजार रुपये तर गणेश भोळे यांचे २ लाख ५ हजार रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.


कारूळमधील ६३ कुटुंबांना स्थलांतराची नोटीस
सततच्या पावसामुळे कारूळ येथील भूस्खलनग्रस्त ६३ कुटुंबांना शुक्रवारी ग्रामसेवक साईनाथ बागुल यांनी स्थलांतराची नोटीस बजावली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवणे आवश्यक बनले आहे.
इतर नुकसानीचे चित्र

इतर नुकसानीचे चित्र

गुहागर तालुक्यात गेल्या तीन दिवसांत २८८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे रस्त्याशेजारील गटारांमध्ये खोदकाम झाल्याने आणि ती व्यवस्थित बुजवली न गेल्याने रस्ते धोकादायक बनले आहेत.

मळण रस्त्यावर माती आल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात झाल्याचे प्रसंग घडले. साखरीआगर गाव गुरुवारपासून अंधारात आहे, तर भातगाव बौद्धवाडी येथील बौद्धविहाराची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. शुक्रवारी दुपारनंतर पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *