चिपळूण : उपचारादरम्यान 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मिरजोळी परिसरात हळहळ

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कल्पेश अनंत निवाते (वय ३२, रा. मिरजोळी दत्तवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश निवाते याला काही दिवसांपासून तापाचा त्रास होत होता. याच दरम्यान तो दुचाकीवरून पडल्याने जखमीही झाला होता. प्रकृती खालावत असल्याने त्याला उपचारासाठी प्रथम चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय उपचार सुरू असतानाही त्याच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही.

प्रकृती अधिक गंभीर झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील उपचारांसाठी सावर्डे येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे ठरले आणि १० जून २०२६ रोजी पहाटे १ वाजून ४९ मिनिटांनी त्याची प्राणज्योत मालवली. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कल्पेशच्या सख्ख्या लहान भावाने दिलेल्या खबरीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात १३ जून २०२६ रोजी भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक तपास प्रक्रिया सुरू असून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. दरम्यान, तरुण वयात कल्पेश निवाते यांचे निधन झाल्याने मिरजोळी दत्तवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *