ग्रामीण भागातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक जाणिवेतून कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या वतीने ‘कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

दाभोळ परिसरातील अनेक रुग्णांना उपचारादरम्यान फाऊलर बेड, व्हीलचेअर, वॉकर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, स्ट्रेचर, कमोड चेअर, स्टिक्स, युरिन पॉट यांसारखे साहित्य तातडीने उपलब्ध होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गरज ओळखून प्रतिष्ठानने हे रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू केले असून, आता गरजू रुग्णांना आवश्यक साहित्य सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.


या केंद्राला दाभोळचे ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेला अभिवादन म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. केंद्रासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी डॉ. लुकतुके यांचे नातू आदित्य पंडित आणि शंतनू गुर्जर यांनी प्रतिष्ठानला मोलाचे आर्थिक सहकार्य केल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी दिली.


उद्घाटनप्रसंगी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी हे केंद्र निश्चितच मोठा आधार ठरेल. समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या युवकांनी उभारलेला हा उपक्रम इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी असून अशा सेवाभावी कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला दाभोळ परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपीन पाटणे, कार्यवाह गंगाराम इदाते, डॉ. आनंद गोंधळेकर, रोहन तोडणकर, ओमकार कात्रे, राहुल गोंधळेकर, कौस्तुभ वैद्य, रोहन यादव, दीप कुडाळकर, दीपक कुतरेकर, संदेश साळवी, सुनील पाथे, विनय पारदळे, पंकज पालकर, किशोर तांबडे आदींसह अनेक मान्यवरांचा सहभाग होता.
या रुग्णोपयोगी साहित्य केंद्रामुळे दाभोळ आणि परिसरातील गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य वेळेवर उपलब्ध होणार असून, समाजसेवेच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल मानले जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













