दापोली : नारगोली येथे ट्रक-बोलेरो पिकअपची धडक, दोघांना किरकोळ दुखापत

banner 468x60

दापोली तालुक्यातील नारगोली येथे वळणाच्या रस्त्यावर ट्रक आणि बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बोलेरो पिकअपमधील चालकासह एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास घडली.

याबाबत ट्रकचालक मनिष प्रमोद यादव (वय २८, रा. निवे-बुद्रुक, सरोदेवाडी, ता. संगमेश्वर) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बोलेरो पिकअप चालक जितेंद्र जनार्दन भैरवकर (रा. खेड, कुंभारआळी, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष यादव हे त्यांच्या ताब्यातील रिकामा ट्रक (एमएच ०४ केयू ४५८६) घेऊन दापोलीहून रत्नागिरीच्या दिशेने जात होते. नारगोली येथील वळणाच्या रस्त्यावर त्यांचा ट्रक आला असता समोरून खेडकडून दापोलीच्या दिशेने बोलेरो पिकअप (एमएच ०८ एपी ६११२) येत होती.

या वेळी बोलेरो पिकअप चालक जितेंद्र भैरवकर याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगात, बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप आहे. पिकअपने ट्रकच्या समोरील उजव्या बाजूस धडक दिली. या धडकेत पिकअपमधील चालक व त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(ब), ३२४ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *