चिपळूण : मगरीने आईला पाण्यात ओढले, दहा वर्षांच्या लेकीने वाचवले प्राण!स्वर्णीच्या धाडसामुळे आईचा जीव वाचला

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली. मगरीने महिलेला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला असता, तिच्यासोबत असलेल्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीने प्रसंगावधान राखत आईचा हात घट्ट पकडून तिला नदीच्या बाहेर खेचले. स्वर्णीच्या या धाडसामुळे तिच्या आईचा जीव वाचला.

banner 728x90

वालोपे गणेशवाडी येथील नंदिनी पवार (३५) या आपल्या दहा वर्षांच्या मुलगी स्वर्णीसोबत वाशिष्ठी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना अचानक पाण्यातून मगरीने त्यांच्यावर झडप घातली. मगरीने नंदिनी पवार यांना पकडून पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या घाबरल्या आणि नदीत ओढल्या जाऊ लागल्या.

आईवर आलेला हा प्रसंग पाहून दहा वर्षांची स्वर्णी घाबरून न जाता पुढे झाली. तिने आईचा हात घट्ट पकडला आणि पूर्ण ताकदीनिशी तिला नदीच्या दिशेने बाहेर खेचण्यास सुरुवात केली. मगरीच्या तावडीतून आईला बाहेर काढण्यासाठी स्वर्णीने केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर नंदिनी पवार यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली. या घटनेत नंदिनी पवार जखमी झाल्या आहेत.

घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी कामथे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या जखमांवर उपचार सुरू असून घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. वनविभागाकडून या घटनेची माहिती घेण्यात आली असून नदी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पावसाळ्यात वाशिष्ठी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने नदी परिसरात मगरींचा वावर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नदीकाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. नदीत पोहणे, कपडे अथवा जनावरे धुण्यासाठी पाण्यात उतरणे टाळावे. तसेच लहान मुलांना नदीकाठी एकटे सोडू नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

या घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून आईला मगरीच्या तावडीतून बाहेर काढणाऱ्या दहा वर्षांच्या स्वर्णीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रसंगावधान आणि धैर्य दाखवत स्वर्णीने केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *