कुर्धे येथील लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा एक भाग कोसळून सुपरवायझर अक्षय काटे यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेने संपूर्ण तालुका हादरला असतानाच आता या कामासंदर्भात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्या पुलाच्या बांधकामादरम्यान हा जीवघेणा अपघात झाला, त्या कामाला अद्याप अधिकृत मंजुरी मिळाली नव्हती आणि निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली नव्हती, अशी माहिती चर्चेत आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कुर्धे गावातील लिंगायतवाडी आणि खोताचीवाडी यांना जोडणाऱ्या छोट्या नदीवरील साकव गेल्या काही वर्षांत जीर्ण झाला होता. पावसाळ्यात या मार्गावरून ये-जा करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे कायमस्वरूपी वाहनांसाठी पूल उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत साकव विकास कार्यक्रमांतर्गत सुमारे ५५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
मात्र, या प्रस्तावाला अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळण्यापूर्वीच आणि निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्याची माहिती आता पुढे येत आहे. जर ही बाब खरी असेल, तर शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून काम सुरू करण्यास परवानगी कोणी दिली, कामाची जबाबदारी कोणाकडे होती आणि बांधकामाची तांत्रिक तपासणी झाली होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, मंगळवारी बांधकाम सुरू असताना पुलावरील काँक्रीटचा भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत सुपरवायझर अक्षय काटे यांचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबरोबरच कामाच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर शंका व्यक्त केल्या जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अर्धवट अवस्थेत राहिलेल्या पुलामुळे आगामी पावसाळ्यात नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, अशी चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षित ये-जा व्यवस्थेसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था उभारण्याच्या सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या दुर्घटनेनंतर प्रशासनाने सखोल चौकशीचे संकेत दिले आहेत. पुलाच्या कामासंदर्भातील मंजुरी प्रक्रिया, निविदा प्रक्रिया, आर्थिक तरतूद, कामाची गुणवत्ता आणि सुरक्षा नियमांचे पालन यासह सर्व बाबींची चौकशी केली जाणार आहे. चौकशीतून नेमके काय सत्य समोर येते, नियमांचे उल्लंघन झाले का आणि या दुर्घटनेस जबाबदार कोण, याकडे आता संपूर्ण दापोली तालुक्याचे लक्ष लागले आहे. एका निष्पाप कामगाराचा बळी घेतलेल्या या दुर्घटनेमागील वास्तव समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













