रत्नागिरी : विहिरीत बुडून 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील भावे आडोम गावडे गोरीवलेवाडी परिसरातील भुताचे कातळ येथे विहिरीच्या पाण्यात बुडून ४७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. संतोष दादू आंबेकर (वय ४७, रा. भावे आडोम गावडे गोरीवलेवाडी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोणीही पुढे येत नसताना मजगाव येथील तीन तरुणांनी धाडस दाखवत मृतदेह बाहेर काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी संकेत संजय कारकर हे भुताचे कातळ परिसरातील एका विहिरीजवळून जात असताना त्यांना विहिरीच्या काठावर चप्पल आणि लाकडी काठी बेवारस स्थितीत आढळली. त्यामुळे विहिरीत कोणीतरी पडले असावे, असा संशय त्यांना आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता पाण्यावर एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला. यानंतर त्यांनी तत्काळ वाडीतील ग्रामस्थांना बोलावून घेतले.

विहिरीबाहेर आढळलेली चप्पल, लाकडी काठी आणि पाण्यातील कपड्यांवरून हा मृतदेह गावातील संतोष आंबेकर यांचा असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांचे पुत्र दुर्वेश संतोष आंबेकर यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनीही उपलब्ध खुणांवरून मृतदेह आपल्या वडिलांचाच असल्याची खात्री केली.

माजी सरपंचांच्या पुढाकारातून मदतीची व्यवस्था

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील माने यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मात्र, विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोणीही विहिरीत उतरण्यास तयार होत नव्हते. अशा परिस्थितीत दांडे आडोमचे माजी सरपंच कैलास तांबे यांनी मजगावचे माजी सरपंच फैयाज मुकादम यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.

फैयाज मुकादम यांच्या सूचनेनुसार, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या मजगाव येथील हरीश पोमेटकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. दरम्यान, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.

माहिती मिळताच हरीश पोमेटकर, गफूर काझी आणि झियान मुकादम यांनी घटनास्थळी धाव घेतली. हरीश पोमेटकर आणि गफूर काझी यांनी दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, तर झियान मुकादम यांनी विहिरीबाहेरून त्यांना मदत केली. तिघांच्या प्रयत्नांमुळे संतोष आंबेकर यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले.

सामाजिक कार्यामुळे परिसरात कौतुक

मजगाव येथील हे तिन्ही तरुण यापूर्वीही विहिरीत पडलेल्या मुक्या जनावरांना बाहेर काढणे, तसेच लोकवस्तीत शिरलेल्या विषारी सर्पांना पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडणे यांसारखी सामाजिक कामे विनामूल्य करत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेतही त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मृतदेह बाहेर काढण्यास मदत झाली. त्यांच्या या कार्याचे पोलीस प्रशासन, माजी सरपंच आणि दांडे आडोम येथील ग्रामस्थांनी कौतुक केले.

पोलिसांकडून पंचनामा; पुढील तपास सुरू

मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून संतोष आंबेकर यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ९६/२०२६ अशी नोंद केली आहे. संतोष आंबेकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *