रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी अरांक्षा यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील आठ परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश मंगळवारी (२५ ऑगस्ट) गृह विभागाकडून जारी करण्यात आले. त्यामध्ये अरांक्षा यादव यांचा समावेश आहे.
अरांक्षा यादव यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. आता त्यांच्याकडे रत्नागिरी उपविभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोल्हापूर येथे कार्यरत असताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला विशेष गती दिली होती.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघर येथे जातपडताळणी विभागाचे डीवायएसपी म्हणून बदली झाली होती. मात्र, त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्याने माईनकर काही काळ रत्नागिरी उपविभागाचा कार्यभार सांभाळत होते. आता अरांक्षा यादव यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी उपविभागाला नवे नेतृत्व मिळाले आहे.
अरांक्षा यादव या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी असून, त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये देशात २०२ वा क्रमांक मिळवला होता. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या यादव यांचे शिक्षण दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाले आहे.
सुरुवातीला त्यांना गुजरात कॅडर मिळाले होते. मात्र, २०२१ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचे कॅडर महाराष्ट्रात बदलण्यात आले. आता रत्नागिरी उपविभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कायदा-सुव्यवस्था, अंमली पदार्थविरोधी कारवाई आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













