डोंगराळ भाग, घनदाट जंगल आणि पावसाचा मारा अशा प्रतिकूल परिस्थितीतही कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या पोलिसांना आता बंदोबस्ताच्या ठिकाणी निवारा आणि वीजपुरवठ्याची सुविधा मिळणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी AIR BEAM INFLATABLE TENT आणि PORTABLE INVERTER GENSET ही अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कर्तव्यपालनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या पुढाकारातून ही व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली या उपकरणांच्या वापराबाबत पोलिसांना प्रशिक्षणही देण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता, अनेकदा पोलिसांना दुर्गम आणि जंगलमय परिसरात दीर्घकाळ बंदोबस्तासाठी तैनात राहावे लागते. सण-उत्सव, विविध सार्वजनिक कार्यक्रम आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रसंगी रात्रंदिवस कर्तव्य बजावताना पाऊस, प्रतिकूल हवामान आणि निवाऱ्याच्या अभावाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पोलिसांना सुरक्षित निवारा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध होणे महत्त्वाचे ठरते. याच गरजेचा विचार करून रत्नागिरी पोलीस दलासाठी ही आधुनिक उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत.
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या पुढाकारातून उपलब्ध झालेल्या या सुविधांमुळे बंदोबस्ताच्या ठिकाणी तात्पुरता निवारा उभारणे शक्य होणार आहे. AIR BEAM INFLATABLE TENT या हवेच्या दाबावर उभारल्या जाणाऱ्या तंबूमुळे प्रतिकूल हवामानात पोलिसांना निवाऱ्याची सुविधा मिळू शकते. तर PORTABLE INVERTER GENSET या उपकरणामुळे आवश्यकतेनुसार वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील बंदोबस्त अधिक सोयीस्करपणे पार पाडण्याच्या दृष्टीने या सुविधांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांना या उपकरणांच्या वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस मुख्यालय येथे तंबू उभारून त्यातील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आली. यावेळी माहिती देताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळी वातावरण आणि जंगलमय भौगोलिक परिस्थितीमुळे विविध ठिकाणी पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात राहावे लागते. अनेकदा पावसात आणि प्रतिकूल परिस्थितीतही पोलिसांना आपले कर्तव्य बजावावे लागते.
अशा वेळी त्यांना निवाऱ्याची सुविधा मिळावी, या दृष्टीने पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून रत्नागिरी पोलीस दलाला टेंट उपलब्ध करून दिले आहेत. या सुविधेमुळे बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलिसांना निवाऱ्याचा आधार मिळेल. विशेषतः जंगलमय आणि दुर्गम भागांत बंदोबस्त करताना या टेंटचा उपयोग होणार आहे. प्रतिकूल हवामानातही पोलिसांना अधिक सोयीस्कर पद्धतीने कर्तव्य बजावता यावे, हा या सुविधेमागील मुख्य उद्देश आहे. पोलीस दलासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचे नितीन बगाटे यांनी विशेष आभार मानले आहे.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या कार्यक्षमतेइतकीच त्यांच्या सुरक्षिततेची आणि मूलभूत सुविधांचीही काळजी घेणे आवश्यक असते. प्रतिकूल हवामानातही जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निवारा आणि वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः पावसाळ्यातील बंदोबस्त आणि दुर्गम भागातील तैनातीदरम्यान या उपकरणांचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













