रत्नागिरी : नगराध्यक्षांच्या पाहणीनंतरही गटारे तुंबलेलीच, पावसाळ्यापूर्वीच रत्नागिरीकरांची चिंता वाढली

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सर्वदूर पावसाचं आगमन झालं आहे. मात्र रत्नागिरी शहरातील गटारसफाईच्या कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी शहरातील तुंबणाऱ्या गटारांची साफसफाई मोहीम हाती घेतली होती. मात्र, या मोहिमेनंतरही शहरातील अनेक भागांमध्ये गटारे तुंबलेलीच असल्याचे चित्र समोर आले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

banner 728x90

शहरातील विविध भागांतील गटारांची आणि नाल्यांची स्थिती पाहण्यासाठी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेवक बाबा नागवेकर, बंटी कीर तसेच नगर परिषदेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला होता. या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी गटारांमध्ये गाळ साचलेला असल्याचे, नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याचे आणि पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले होते.

मात्र, पाहणीनंतरही संबंधित विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः हिंदू कॉलनी परिसरातील भाजी मार्केटजवळील गटारांची अवस्था चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. यामुळे व्यापारी, नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यंदाही पावसाळा तोंडावर आला असताना येथील गटारांची पुरेशी साफसफाई न झाल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

शहरातील अनेक गटारांमध्ये प्लास्टिक कचरा, गाळ, झाडांची पाने आणि इतर घाण साचलेली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी, मुसळधार पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा वेगाने होणार नाही आणि अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्यावरही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनावर नाराजी व्यक्त करत केवळ पाहणी दौरे करून चालणार नाही, तर प्रत्यक्षात गटारसफाई आणि नाल्यांची दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे. तुंबलेल्या गटारांमुळे डासांची उत्पत्ती वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्यास वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटारसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा पहिल्याच जोरदार पावसात शहरातील अनेक भाग जलमय होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रलंबित स्वच्छता कामे पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *