रत्नागिरी : पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गाची दाणादाण, चिखल, खचलेले रस्ते अन् प्रवाशांचा जीव धोक्यात

banner 468x60

पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावरील अर्धवट आणि निकृष्ट कामाचे वास्तव समोर आले आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले असून, दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

यंदा पाऊस उशिरा सुरू झाला असतानाही महामार्गाच्या कामासाठी नियुक्त ठेकेदारांनी पावसाळ्यापूर्वी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप होत आहे. परिणामी, पहिल्याच पावसात महामार्गाची दुरवस्था उघडकीस आली.

लांजा शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन केले होते का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्गावरील चिखलातून मार्ग काढत वाहन चालवणे हे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यासारखे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

उक्षी आणि तुरळ परिसरातही मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून वाहनांची कसरत सुरू आहे. हातखंबा येथे अर्धवट कामामुळे शाळेसमोर चिखलाचे ढीग पडले असून विद्यार्थी आणि पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, खेड तालुक्यातील आवाशी येथे रस्ता खचल्याने अपघाताची घटना घडली. त्यामुळे महामार्गावरील कामाच्या दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने दुरुस्तीची कामे करून प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *