रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सीएनजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तसेच खेड-लोटे परिसरातील अनेक सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामामुळे मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या वाढली असून सीएनजीची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने अनेक पंपांवर सीएनजी लवकर संपत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी वाहन चालकांना अनेक तास रांगेत थांबावे लागत आहे.
रत्नागिरी शहरातील काही सीएनजी पंपांवर तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळपासूनच वाहन चालक पंपांवर गर्दी करत असून, काही ठिकाणी वाहनधारकांना दोन ते अडीच तास प्रतीक्षा करून सीएनजी भरून घ्यावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालक, टॅक्सी चालक तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसत आहे.
सीएनजीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने अनेक वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. काही वाहन चालकांनी प्रशासन आणि गॅस कंपन्यांनी तातडीने लक्ष घालून अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, सीएनजी पंपांवरील गर्दीमुळे वाहतुकीवरही परिणाम होत असून काही ठिकाणी किरकोळ वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. येत्या काही दिवसांत पुरवठा सुरळीत न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













