रत्नागिरी : 16 वर्षीय मुलीची आत्महत्या, राजिवडा परिसरात हळहळ

banner 468x60

रत्नागिरी शहरालगतच्या राजिवडा परिसरात एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अर्चना दीपक बोंद्रे (वय १६) असे मृत मुलीचे नाव आहे. उमलत्या वयातच तिने टोकाचे पाऊल उचलल्याने बोंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना ही राजिवडा येथील टेक्निकल हायस्कूलजवळ असलेल्या भाड्याच्या खोलीत कुटुंबासोबत राहत होती. सोमवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याची संधी साधून तिने ओढणीच्या सहाय्याने घरातील लाकडी वाशाला गळफास घेतल्याचे सांगण्यात येते. काही वेळाने तिच्या बहिणीच्या निदर्शनास ही बाब आली. तिने तात्काळ कुटुंबीयांना कळवले.

घटनेनंतर अर्चनाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अर्चनाने इतके टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कुटुंबीयांनाही याबाबत काहीच कल्पना नसल्याचे समजते. त्यामुळे या घटनेमागील कारणांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच रुग्णालयात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या घटनेमुळे राजिवडा परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. शेजारी व परिचितांकडून अर्चना शांत व अभ्यासू स्वभावाची असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या अकाली निधनाने परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *