रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत भूस्खलन आणि जमिनीची धूप होण्याच्या घटना घडत असतानाच राजापूर तालुक्यातील आंगले गावातील वरची राऊतवाडी येथे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा गंभीर परिणाम समोर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संरक्षक भिंतीची मागणी प्रलंबित असलेल्या या ठिकाणी रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यालगतचा संरक्षक कठडा पूर्णपणे कोसळला. त्यामुळे सीताराम राऊत यांच्या घराला भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला असून परिसरातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वरची राऊतवाडीतील घरे ओढ्यालगत असल्याने या भागात दरवर्षी पावसाळ्यात जमिनीची धूप होत असते. विशेषतः सीताराम राऊत यांच्या घराजवळील संरक्षक कठडा गेल्या काही वर्षांपासून धोकादायक अवस्थेत होता. त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. मात्र अनेक वर्षे उलटूनही या मागणीची दखल घेण्यात आली नाही.

या प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागासह विविध शासकीय कार्यालयांना वारंवार निवेदने देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली.
या ठिकाणी तातडीने संरक्षक भिंत उभारली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशाराही वेळोवेळी देण्यात आला होता.
विलास राऊत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर काही वर्षांपूर्वी या कामाचा प्रस्ताव मुंबई मंत्रालयात पाठविण्यात आला होता. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने हा प्रस्ताव प्रलंबित राहिला आणि कामाला मंजुरी मिळाली नाही. परिणामी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने अखेर मुसळधार पावसात संरक्षक कठडा कोसळून परिस्थिती गंभीर बनली आहे.
रविवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे घरालगतची जमीन मोठ्या प्रमाणात खचली. ओढ्याच्या पाण्याचा वेग प्रचंड वाढल्याने कठडा पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे घराचा पाया उघडा पडला असून आणखी पाऊस झाल्यास संपूर्ण घर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय ओढ्यालगतची शेतीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सुपीक माती वाहून गेल्याने शेतीचे भवितव्यही धोक्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या मते, प्रशासनाने योग्य वेळी संरक्षक भिंत उभारली असती तर आज घरे आणि शेतीवर आलेले हे संकट टाळता आले असते. मात्र सातत्याने निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक कुटुंबांच्या जीवित आणि वित्त सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी शासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित भेट देऊन पंचनामा करावा, बाधित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, ओढ्यालगत तात्पुरत्या संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात आणि आंगले गावातील वरची राऊतवाडी येथे दोन्ही बाजूंनी कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा अधिक वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि संबंधित प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशाराही विलास राऊत यांनी दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













