खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये झालेल्या भीषण भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाने शोधून काढले. सतीश शांताराम शेलार (वय ३०) आणि शांताराम बलराम शेलार (वय ८४) अशी मृतांची नावे असून, आवश्यक कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांचे मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री दहिवली येथील शेलारवाडीमध्ये अचानक भूस्खलन झाले. या दुर्घटनेत शेलार कुटुंबाचे घर माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
बचावकार्यात कल्पना शांताराम शेलार (वय ७३) यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, बेपत्ता असलेल्या सतीश शेलार आणि शांताराम शेलार यांच्या शोधासाठी एनडीआरएफचे विशेष पथक मध्यरात्री चिपळूणहून घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पाऊस, अंधार आणि ढिगाऱ्याचे मोठे प्रमाण यामुळे शोधकार्यात अनेक अडथळे निर्माण होत होते. प्रतिकूल परिस्थिती असूनही एनडीआरएफच्या जवानांनी रात्रभर शोधमोहीम सुरू ठेवली.
अखेर मंगळवारी शोधमोहीमेदरम्यान दोन्ही बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पंचनामा, शवविच्छेदनासह आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने डोंगराळ भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













