राजापूर : कोदवली फाट्यावर पोलिसांची धडक कारवाई, 13 लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत राजापूर तालुक्यातील कोदवली पहिला बस स्टॉप फाटा येथे तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांहून अधिक किमतीचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईत दोन वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली असून कणकवली तालुक्यातील तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

या प्रकरणी अमोल लक्ष्मण चिंदरकर (वय ३५), अमित धोंडू चिंदरकर (वय ३४) आणि प्रशांत प्रकाश पवार (वय २९, सर्व रा. कलमठ, गावडेवाडी, ता. कणकवली) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ मे २०२६ रोजी रात्री सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास कोदवली पहिला बस स्टॉप फाटा परिसरात पोलिसांची गस्त सुरू होती. यावेळी संशयित हालचाली लक्षात आल्याने पोलिसांनी बोलेरो पीकअप (एमएच ०७ एजे ५०७५) आणि इनोव्हा कार (एमएच ४३ व्ही २८२९) या दोन वाहनांची तपासणी केली. तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांमधून विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले.

वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध ब्रँडच्या सीलबंद दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये गोल्डन एस ब्लू व्हिस्की, हेवर्ड्स फाईन व्हिस्की, मॅकडॉवेल नंबर १ तसेच ओकस्मिथ या ब्रँडच्या हजारो बाटल्यांचा समावेश आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या दारूसाठ्याची किंमत ३ लाख ५० हजार २५६ रुपये इतकी असल्याचे सांगितले आहे.

याशिवाय अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो पीकअप आणि इनोव्हा कार ही दोन्ही वाहनेही पोलिसांनी जप्त केली. प्रत्येकी सुमारे पाच लाख रुपये किमतीची ही वाहने असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १३ लाख ५० हजार २५६ रुपये इतकी झाली आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल लक्ष्मण केसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात २४ मे रोजी मध्यरात्री महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (अ) आणि ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कोकण पट्ट्यात गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू असून या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *