सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय रत्नागिरी आणि श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यातील मोरोशी गावात भव्य आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.

अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मोरोशी गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी लाईटचे पोल कोसळले, पाणीपुरवठा विस्कळीत झाला तसेच जनजीवन ठप्प झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामस्थांनी मोठ्या सहकार्याची भूमिका घेत शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली.

मोरोशी गावकरवाडी येथील श्री गुंडीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात १२३ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काही रुग्णांची पुढील शस्त्रक्रियेसाठी निवडही करण्यात आली. तसेच आयोजित योगा शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांमुळे शिबिराला सामाजिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
या शिबिरासाठी लांजा येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयाचे डॉ. सुहास खानविलकर व त्यांची डॉक्टरांची टीम तसेच श्री स्वामी समर्थ नेत्र रुग्णालयाचे डॉ. सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष योगदान दिले. ग्रामस्थांनी सर्व वैद्यकीय पथकांचे मनापासून आभार मानले.
शिबिराचे नियोजन शशिकांत चव्हाण यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगितले. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” असे सांगत दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत अशा आरोग्यसेवा भविष्यातही गावात उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी गुंडीबाई चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य विश्वस्त प्रकाश सुमती मोतीराम कानडे, विश्वस्त दिलीप कानडे, काशिनाथ केसरकर, रविंद्र कानडे, नामदेव कानडे, माजी सरपंच राजेश कानडे, श्रीरंग कानडे, आत्माराम नारकर, पुंडलिक कानडे, गुणाजी कानडे, रमेश कानडे तसेच ट्रस्टचे सभासद आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













