पावसाळ्यात राजापूर शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात पावसाचे पाणी शिरण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांचे तसेच व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. संभाव्य पूरपरिस्थितीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत मिळावी, त्यांचे सुरक्षित स्थलांतर करता यावे आणि कोणतीही जीवितहानी टाळता यावी, या उद्देशाने राजापूर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आपत्कालीन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शहरातील वरची पेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरात बोट हाताळणी, जलतरण तसेच पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देण्यात आले. आपत्तीच्या काळात बचावकार्य अधिक प्रभावी आणि जलदगतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची माहिती सहभागी कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
या प्रशिक्षण शिबिरावेळी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक अमित यादव, स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, सहायक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील तसेच श्री. खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष बोट चालविणे, बचावकार्याची पद्धत, तसेच पूराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रशिक्षण घेतले.
आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व लक्षात घेऊन या उपक्रमात लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, पोलीस मित्र आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये नगरसेवक दिलीप अमरे, सिद्धांत जाधव, नगरसेविका आफरोज झारी यांच्यासह मुकादम राजन जाधव, सुशील यादव, गोपनीय पोलीस नरेश गुरव आणि अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूर प्रशासनाने संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी सुरू केली असून संपूर्ण यंत्रणा हायअलर्टवर ठेवण्यात आली आहे. पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने मदतकार्य राबविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. या प्रशिक्षणामुळे संबंधित यंत्रणांचा समन्वय अधिक मजबूत होणार असून आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी आणि वेळेवर बचावकार्य करणे शक्य होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













