पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. डोंगराळ भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा तसेच जीवितहानीचा धोका लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६१ वरील रघुवीर घाटात साखळी क्र. १०३/०० ते १०४/०० दरम्यान दरीकडील रस्त्याची कडा तुटली असून कि.मी. १००/५०० ते १०५/५०० या दरम्यान डांबरी रस्ता आणि साईडपट्टी खचली आहे. तसेच रस्त्यावर माती व दगड साचल्याने डांबरी पृष्ठभागाला तडे गेले असून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील पर्यटनावर तात्पुरती बंदी घातली आहे.
आदेशानुसार केवळ पुढील वाहनांनाच परवानगी असेल :
अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसेस
पुढील वाहनांना व पर्यटकांना बंदी :
सर्व प्रकारची जड वाहने
इतर सर्व खासगी वाहने
घाटातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी थांबण्यास व पर्यटनासाठी प्रवेश करण्यास पूर्णतः मनाई
नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी आणि मानवी जीविताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आदेशाचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













