रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील संशयित आरोपी राकेश कृष्णा फणसकर (वय ४०, रा. ढोरसई, साई मंदिराजवळ, दाभोळ) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १३ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत गेल्या वर्षभरात अनेक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, जून २०२५ मध्ये आरोपीने मुलीला ढोरसई येथील साई मंदिराजवळील जंगल परिसरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्येही दाभोळ येथील बौद्धवाडी पाखाडी परिसरातील जंगलात नेऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनांबाबत भीतीपोटी किंवा अन्य कारणांमुळे पीडित मुलगी त्यावेळी कोणाकडेही तक्रार करू शकली नव्हती, असे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपासून पीडित मुलीच्या प्रकृतीत बदल जाणवत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न होताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीचा जबाब नोंदविला. जबाबात तिने संशयित आरोपी राकेश फणसकर याचे नाव सांगितल्याने पोलिसांनी तत्काळ कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
पीडितेच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात सुरुवातीला शून्य क्रमांक ००/२०२६ ने गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने दापोली पोलिसांनी सर्व कागदपत्रे पुढील तपासासाठी दाभोळ सागरी पोलीस ठाण्याकडे वर्ग केली. त्यानंतर दाभोळ सागरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, नधील कलम ६४(१) व ६४(२) (एम) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम, २०१२ मधील कलम ४, ६ आणि ८ अन्वये गुन्हा (रजि. नं. २१/२०२६) दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे हे पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













