दाभोळमध्ये खळबळ – अल्पवयीन मुलीवर ढोरसईमधील नराधमाकडून अत्याचार, पीडिता 5 महिन्याची गरोदर राहिल्याने दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळमधून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 40 वर्षीय नराधमाने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी 5 महिन्याची गरोदर राहिली असून,दापोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी दाभोळ सागरी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण दापोली तालुक्यात आणि दाभोळ गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे.



दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राकेश कृष्णा फणसकर वय 40 वर्षे, रा. ढोरसई,साई मंदिराजवळ, दाभोळ,ता.दापोली,जि. रत्नागिरी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी राकेश याने पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत गेल्या वर्षभरापासून तिच्यावर शारीरिक संबंध ठेवला होता.


​जून 2025 मध्ये आरोपीने पीडित मुलीला जबरदस्तीने ढोरसई येथील साई मंदिराजवळील दाट जंगलमय भागात नेले आणि जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा एकदा फेब्रुवारी 2026 मध्ये शनिवारी दुपारी 12 : 00 वाजण्याच्या सुमारास आरोपीने तिला दाभोळ बौद्धवाडी पाखाडी येथील जंगलात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलीच्या प्रकृतीत बदल होऊ लागल्याने,ती दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आली होती. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती अल्पवयीन मुलगी 5 महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार समोर येताच दापोली रुग्णालयातील प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केले. घडलेला धक्कादायक प्रकार समजताच पीडितेने रुग्णालयातच हजर राहिलेल्या दापोली पोलिसांकडे आरोपी राकेश फणसकर याच्याविरुद्ध रीतसर कायदेशीर तक्रार दिली.


​’पोक्सो’सह भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे दापोली पोलीस ठाण्यात सुरुवातीला शून्य 00/2026 क्रमांकाने गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर दापोली पोलीस ठाणे जावक क्र. ७०८३/२०२६, दिनांक 07/07 /2026 अन्वये सदर गुन्ह्याची सर्व कागदपत्रे पुढील कारवाईसाठी दाभोळ सागरी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली.


​दाभोळ सागरी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राकेश कृष्णा फणसकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१), ६४(२)(M) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) चे कलम ४,६ आणि ८ अन्वये गुन्हा (रजि. नं. २१/२०२६) दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांनी स्वतः या गुन्ह्याचा तपास हाती घेतला आहे. पोलिसांनी गुन्ह्याची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दिली असून, या घटनेची पहिली माहिती प्रथमवर्ग न्यायालय, दापोली येथे रवाना करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *