मंडणगड : तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा, मोठे नुकसान, पंचनामे सुरू

banner 468x60

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पडझड व आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या, झाडे घरांवर पडली, शेती पाण्याखाली गेली असून वाहतूक व वीजपुरवठाही विस्कळीत झाला आहे.

banner 728x90

टाकेडे येथे एका घराजवळील संरक्षक चिऱ्याची भिंत कोसळली. तसेच पिंपळोली येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंतही जमीनदोस्त झाली आहे. घराडी येथे दोन घरांवर झाडे कोसळल्याने सुमारे ₹1.20 लाखांचे नुकसान झाले आहे.

सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून भातशेती मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली आहे. अनेक रस्त्यांवर माती व दगड आल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. मंडणगड–भिंगळोली परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर भराव वाहून गेल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

याशिवाय, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

महसूल विभागाच्या माहितीनुसार, २ जुलै रोजी १३१ मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पाऊस ६९७ मिमी इतका झाला आहे. संबंधित विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू असून, नुकसानग्रस्तांना मदत देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *