मंडणगड तालुक्यात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंडणगड–म्हाप्रळ मार्गावरील शेनाळे गावच्या हद्दीत देशमुख बागेजवळ डोंगराची मोठी दरड कोसळल्याने या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
दरड कोसळल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे, मोठमोठे दगड तसेच झाडे-झुडपे आल्याने संपूर्ण मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या वर्दळीच्या मार्गावरील संपर्क तुटला असून वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
हा मार्ग लोणंद-राजावाडी ते आंबडवे राष्ट्रीय महामार्गाचा महत्त्वाचा भाग असून, मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यांना मुंबई, पुणे व ठाणे शहरांशी जोडणारा प्रमुख दुवा मानला जातो.
यापूर्वीच सावित्री नदीवरील आंबेत पुलाखाली बार्ज अडकल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद आहे. त्यातच शेनाळे येथे झालेल्या दरडीमुळे पर्यायी मार्गही बंद झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने यंत्रणा घटनास्थळी पाठवून दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता डोंगराळ भागातून प्रवास करताना नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













