लांजा : एसटी बसची रिक्षाला समोरासमोर धडक, चालकासह तिघेजण गंभीर जखमी

banner 468x60

लांजा-कोर्ले मार्गावरील केळंबे तेलीवाडी येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षेचे मोठे नुकसान झाले असून अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा येथील वैभव वसाहतीत राहणारे पारितोष प्रशांत वाघधरे (वय ३६) यांनी या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांचे वडील प्रशांत नारायण वाघधरे (वय ६५) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-०८-एक्यू-१८९०) चालवत पत्नी सौ. पल्लवी प्रशांत वाघधरे (वय ६०) आणि नातू पार्थ पारितोष वाघधरे यांच्यासह लांजा येथून विवलीकडे जात होते.

रिक्षा केळंबे-विवली तेलीवाडी येथील विभूते स्टॉप परिसरात पोहोचली असताना समोरून येणाऱ्या एसटी बसने (एमएच-०८-बीटी-२६६७) रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे रिक्षा गंभीररीत्या चेंगरली गेली आणि त्यामधील तिन्ही प्रवासी जखमी झाले.

अपघातात रिक्षाचालक प्रशांत नारायण वाघधरे आणि त्यांची पत्नी पल्लवी वाघधरे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेला नातू पार्थ पारितोष वाघधरे यालाही दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रिक्षेबाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त रिक्षेचे मोठे नुकसान झाले असून बसच्या पुढील भागालाही धक्का बसल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघाताची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून एसटी बसचालकाच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीसह अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *