लांजा : घरात घुसून बिबट्याचा बाप-लेकावर जीवघेणा हल्ला, बेनी बुद्रुकमध्ये भीतीचे सावट

banner 468x60

लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील कुसुममळेवाडीमध्ये बुधवारी रात्री घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वनक्षेत्रातून थेट लोकवस्तीत आलेल्या बिबट्याने घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या त्यांच्या १९ वर्षीय मुलालाही बिबट्याने जखमी केल्याने या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास कुसुममळेवाडीतील एक ५२ वर्षीय रहिवासी आपल्या घरात होते. यावेळी घराच्या पाठीमागील बाजूने दबक्या पावलांनी आलेल्या बिबट्याने अचानक घरात प्रवेश केला. घरात कोणीही काही समजण्याच्या आत बिबट्याने त्या व्यक्तीवर झडप घालत हल्ला चढवला. अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे घरातील सदस्य घाबरून गेले, तर जखमी व्यक्तीने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला.

वडिलांचा आक्रोश ऐकताच त्यांचा १९ वर्षीय मुलगा तात्काळ खोलीकडे धावला. समोरचे भयावह दृश्य पाहून त्याने क्षणाचाही विलंब न करता वडिलांना बिबट्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या बिबट्याने मुलावरही हल्ला केला. या झटापटीत मुलगादेखील जखमी झाला.

तरीही बाप-लेकांनी धाडसाने प्रतिकार सुरू ठेवला. त्यांच्या आरडाओरड्यामुळे आणि घराबाहेर जमलेल्या ग्रामस्थांच्या गोंधळामुळे बिबट्याने अखेर तेथून पळ काढला. या घटनेनंतर जखमी बाप-लेकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे बेनी बुद्रुक, कुसुममळेवाडी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास नागरिक घाबरत असून लहान मुलांना आणि जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, बिबट्याने थेट घरात घुसून हल्ला केल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर संबंधित बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा, रात्रीची गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, बिबट्याचा बंदोबस्त होईपर्यंत नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *