पावसाचे कमी प्रमाण आणि अनियमित पावसामुळे चिपळूण तालुक्यातील शेती अडचणीत आली आहे. भाताच्या लोंब्यांमध्ये अपेक्षित प्रमाणात दाणे भरले नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुकाही दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी, अशी मागणी कृषीवसंत शेतकरी संघाच्या सभेत करण्यात आली.
चिपळूण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित या सभेत तालुक्यातील शेतीची सद्यस्थिती, पिकांचे संभाव्य नुकसान आणि भविष्यातील पाणीटंचाई याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीच्या प्रत्यक्ष परिस्थितीकडे लक्ष वेधले.
भातशेती हिरवीगार; मात्र दाणे भरण्याचे प्रमाण कमी
शेतांमध्ये हिरवळ दिसत असली, तरी भाताच्या लोंब्यांमध्ये अपेक्षित प्रमाणात दाणे भरलेले नाहीत. त्यामुळे केवळ पिकांचा बाह्य रंग आणि स्थिती पाहून शेती चांगली असल्याचा निष्कर्ष काढू नये, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. पिकांच्या प्रत्यक्ष स्थितीची पाहणी करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
भातपिकाबरोबरच आंबा, काजू आणि नारळाच्या बागांनाही पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती आणि फळबागांचे नुकसान लक्षात घेऊन शासनाने चिपळूण तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
नुकसानभरपाईचा लाभ प्रत्यक्ष शेती करणाऱ्या कुळांनाही द्या
शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर झाल्यास तिचा लाभ केवळ जमिनीच्या मालकी हक्कापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष शेती करणाऱ्या कुळांनाही मिळावा, अशी भूमिका सभेत मांडण्यात आली. तसेच शेतकरी महिलांच्या नोंदणी प्रक्रियेत शहर परिसरातील महिलांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांनाही विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी छोटे बंधारे उभारण्याचे आवाहन
कृषी अधिकारी मनोज गांधी यांनी बचत गटांच्या माध्यमातून मूल्यवर्धित पिकांशी संबंधित योजना राबविण्याचे आवाहन केले. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी गावोगावी नद्या, नाले आणि ओढ्यांवर छोटे बंधारे उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाच्या सहकार्याबरोबरच लोकसहभाग आणि शेतकऱ्यांची एकजूट आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन केल्यास आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
दसऱ्यानंतर पुन्हा शेतकरी सभा
या सभेला कृषीवसंत शेतकरी संघाचे अध्यक्ष कृषीभूषण अनंतराव खांबे, शंकरराव जाधव, मनोहर महाडीक, दिनेश दळवी, नागेश बोंडकर, डॉ. रत्नाकर थत्ते, बापू काणे, संतोष तांदळे, प्रकाश नाना कांबळे, विलास डिके, कैसर देसाई आणि संजयराव आंब्रे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
चिपळूण तालुक्यातील शेतीची स्थिती, संभाव्य नुकसान आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर पुढील कार्यवाही व्हावी, यासाठी दसऱ्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष अनंतराव खांबे यांनी सांगितले.
दरम्यान, चिपळूण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीवर शासन काय निर्णय घेते आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













