खेड : विनयभंग प्रकरणात किरण तायडे निर्दोष, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

banner 468x60

खेड येथे विनयभंगाच्या आरोपाखाली न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागलेल्या किरण संजय तायडे यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे, सादर करण्यात आलेले पुरावे आणि संपूर्ण घटनाक्रमाचा बारकाईने विचार करून हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.


या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, काही महिन्यांपूर्वी राजकीय आणि सामाजिक वादातून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर किरण तायडे यांच्या कार्यालयावर काही व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या वेळी तायडे यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली तसेच त्यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी तायडे यांनी संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

banner 728x90

तक्रार दाखल झाल्यानंतर ती मागे घेण्यासाठी तायडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही समोर आले. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता तायडे यांनी आपली भूमिका कायम ठेवली. त्यानंतर त्यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील अॅड. साबळे आणि अॅड. जयेश जाधव यांनी ही तक्रार सूडबुद्धीने आणि दबावातून दाखल करण्यात आल्याचा दावा केला. संबंधित महिलेला विनयभंगाची तक्रार देण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी न्यायालयात मांडला. तसेच तक्रारीतील विसंगती, घटनाक्रमातील बदल आणि उपलब्ध पुराव्यांचा आधार घेत तायडे यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दोन्ही बाजूंचे युक्तीवाद आणि सादर केलेले पुरावे तपासल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने किरण संजय तायडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नसल्याचे नमूद करत त्यांची निर्दोष मुक्तता केली.

या निकालानंतर तायडे समर्थकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. परिसरात या निर्णयाची मोठी चर्चा सुरू असून न्यायालयाच्या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण निकाल म्हणून पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *