खेड : खेड-दापोली मार्गावर लिफ्ट देणे ठरले महाग, चाकूचा धाक दाखवत ऑनलाइन लूट

banner 468x60

खेड-दापोली मार्गावरील कुवे घाट परिसरात चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीकडून ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत दोन संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती दापोलीहून खेडच्या दिशेने प्रवास करत असताना एका व्यक्तीने लिफ्ट मागितली. त्यानंतर वाहन कुवे घाट परिसरात पोहोचताच गाडीत असलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवत पीडित व्यक्तीला धमकावले. आरोपींनी त्याच्या मोबाईलचा ताबा घेत जबरदस्तीने ऑनलाइन व्यवहार करून स्वतःच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून घेतले.

लूट केल्यानंतर आरोपींनी पीडित व्यक्तीला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हॅप्पी ढाबा परिसरात उतरवून घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे दोन्ही संशयितांचा माग काढत त्यांना काही तासांतच ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यामागील इतर धागेदोरे, आरोपींचा पूर्वेतिहास तसेच अशा प्रकारच्या आणखी गुन्ह्यांशी त्यांचा संबंध आहे का, याचा तपास खेड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *