कशेडी घाट येथे खेड डेपोची खेड-बोरिवली एसटी बस भीषण अपघातग्रस्त झाल्याची घटना बुधवारी उशिरा रात्री घडली. रायगड जिल्ह्यातील भोगाव परिसरात रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने समोर असलेल्या बल्कर ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात ट्रक चालकासह बसमधील १२ ते १३ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड आगारातून रात्री १० वाजता सुटलेली ही एसटी बस बोरिवलीच्या दिशेने निघाली होती. कशेडी घाटातील वळणावळणाच्या रस्त्यावरून प्रवास सुरू असताना भोगाव परिसरात अचानक बसचे ब्रेक फेल झाले. घाटातील उतार आणि तीव्र वळणे यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या बल्कर ट्रकवर आदळली.

अपघाताचे ठिकाण अत्यंत धोकादायक असून रस्त्याच्या एका बाजूला खोल दरी आहे. मात्र सुदैवाने बस दरीत कोसळली नाही. काही फूट अंतरावरच बस थांबल्याने मोठी जीवितहानी टळली. अन्यथा गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. काहींना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले, तर गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या भागात सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. स्थानिकांकडून ठेकेदाराकडून पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती. अपघात घडलेल्या ठिकाणीही आवश्यक सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा इशारे अपुरे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अपघाताला निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्यात स्थानिक युवकांनीही मोठा सहभाग घेतला. पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यासोबत पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे.
या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा जुन्या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक पूर्ववत केली.
गेल्या काही वर्षांत कशेडी घाट परिसरात रस्ता खचणे, अपघात आणि वाहतूक अडथळ्यांच्या घटना वारंवार घडत आहेत. यावर उपाय म्हणून कशेडी बोगदा सुरू करण्यात आला असला तरी स्थानिक वाड्या-वस्त्यांकरिता जुन्या घाटमार्गाचा वापर अद्याप सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर घाटातील सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता, सुरक्षा उपाययोजना आणि सार्वजनिक वाहतुकीची स्थिती याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













