खेड : भरदिवसा दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला, 7.98 लाखांचा ऐवज लंपास

banner 468x60

खेड तालुक्यातील भरणे-बाईतवाडी येथील रोटरी स्कूलजवळ असलेल्या ‘आदित्य रेसिडेन्सी’ इमारतीतील दोन बंद घरांचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला. बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास अवघ्या सव्वा तासाच्या कालावधीत ही घरफोडी झाली. या घटनेत तब्बल ७ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अभय सहदेव देसाई (वय ४९, मूळ रा. भडगाव, सध्या रा. आदित्य रेसिडेन्सी, रूम नं. १०१) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय देसाई हे दुपारी १२.१५ ते १.२५ या कालावधीत घराबाहेर गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर शेजारील मिलिंद तुकाराम आदावडे यांच्या रूम क्रमांक १०३ चे कुलूपही तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी दोन्ही घरांतून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. यामध्ये सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन, एक तोळ्याचा सोन्याचा हार, तीन तोळ्यांची सोन्याची नाणी, प्रत्येकी तीन ग्रॅम वजनाची दोन ब्रेसलेट, ११ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातली रिंग, सोन्याचे टॉप्स, बाळी, नथ, सुमारे पाव किलो चांदी, चांदीचा कमरपट्टा आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख ९८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

भरदिवसा वर्दळीच्या परिसरात दोन बंद घरांचे कडी-कुलूप तोडून झालेल्या या धाडसी घरफोडीची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. :::

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *