खेड : 24 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय

banner 468x60

खेड तालुक्यातील संगलट ओवली स्टॉप येथून स्वतःचे वाहन घेऊन बाहेर पडलेला २४ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणाचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगलट मोहल्ला (ता. खेड) येथील हमीम कलाम नाडकर (वय २४) हे १ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास संगलट ओवली स्टॉप येथून स्वतःचे वाहन घेऊन बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत.

बराच वेळ उलटूनही हमीम घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा नातेवाईक, मित्र तसेच परिचितांच्या ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. तीन दिवस उलटूनही त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.

हमीम यांचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी फिरदोस हमीम नाडकर (वय २४) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी खेड पोलिसांकडून तपास सुरू असून, त्याच्या जाण्याचा मार्ग, संपर्कातील व्यक्ती तसेच उपलब्ध इतर माहितीच्या आधारे तपास केला जात आहे. या घटनेमुळे संगलट परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *